रामतीर्थच्या ठाणेदारांची ‘वाळू माफिया बचाव’ मोहीम फसली ; वाहन मालकाच्या तपशीलासह दंडाचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आदेश

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : अवैध वाळू वाहतुकीच्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली हायवा कोणत्याही दंडात्मक कारवाईशिवाय लवकर सोडवून देण्यासाठी थातूरमातूर आणि दिशाभूल करणारे पत्र पाठवून तहसीलदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांना नायगावच्या तहसीलदार धम्मफ्रिया गायकवाड यांनी जोरदार दणका दिला आहे. “वाहन मालकाचे नाव, पत्ता आणि संपूर्ण तपशीलासह दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव तात्काळ सादर करा; कोणताही विलंब खपवून घेतला जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा महसूल प्रशासनाने दिला आहे.
दि. 20 जुलै रोजी रामतीर्थ पोलिसांनी एमएच-26 सीव्ही-9555 क्रमांकाची भारत बेंझ कंपनीची हायवा अवैध वाळू वाहतूक करताना पकडून गुन्हा क्र. 149/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला होता. मात्र, आरोपानुसार या वाहनावर महसूल विभागाकडून दंडात्मक कारवाई होऊ नये आणि वाहन लवकर मुक्त व्हावे, यासाठी आवश्यक कलमे मुद्दाम न लावल्याची चर्चा सुरू झाली.
या प्रकरणाचा पाठपुरावा झाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षकांनी 22 जुलै रोजी तहसीलदारांना पाठविलेल्या पत्रात वाहन क्रमांक, चालकाचे नाव, वाहन मालकाचा तपशील, पत्ता यांसारखी मूलभूत माहितीच न देता, वाहनाचा प्रकार आणि कंपनीबाबतही चुकीची माहिती नमूद केल्याचे समोर आले. हा प्रकार महसूल विभागाची दिशाभूल करून कारवाई टाळण्याचा प्रयत्न असल्याचा संशय अधिक बळावला.
तहसीलदार धम्मफ्रिया गायकवाड यांनी या पत्राची गंभीर दखल घेत महसूल व वन विभागाच्या 17 जुलै 2025 च्या शासन परिपत्रकाचा स्पष्ट उल्लेख करत, अवैध गौण खनिज वाहतुकीच्या प्रकरणात फौजदारी गुन्ह्यासोबतच दंडात्मक कारवाई करणे बंधनकारक असल्याचे हराळे यांच्या निदर्शनास आणून दिले. याच पार्श्वभूमीवर वाहन क्रमांक एमएच-26 सीव्ही-9555 संदर्भातील वाहन मालकाचे नाव, पत्ता व संपूर्ण तपशीलासह दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा आणि कोणताही विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट आदेश तहसीलदारांनी दिले आहेत.
या पत्रामुळे अवैध वाळू माफियांना संरक्षण देण्याचे आरोप पुन्हा एकदा चर्चेत आले असून, महसूल विभागाने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता महसूल विभागाच्या स्पष्ट निर्देशांची रामतीर्थ पोलीस कितपत प्रामाणिकपणे अंमलबजावणी करतात, की पुन्हा एखादा मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



