देहव्यापाराचा संशय असलेल्या नरसीतील लाँजवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, बिट जमादार संशयाच्या भोवऱ्यात

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील नरसी येथील दोन लॉजमध्ये सुरू असल्याचा संशय असलेल्या देहव्यापारावर शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत संपूर्ण पोलीस यंत्रणेलाच हादरा दिला. पोलीस निरीक्षक अतुल भोसले स्वतः दोन पथकांसह घटनास्थळी दाखल होत लॉजची कसून तपासणी केली. धाडीची माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी उसळली.
ही कारवाई केवळ दोन लॉजपुरती मर्यादित नसून, स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे. संबंधित लॉजमध्ये अनेक दिवसांपासून अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची चर्चा असतानाही रामतीर्थ पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही, असा आरोप स्थानिकांकडून सातत्याने केला जात आहे. रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांच्या कार्यकाळात नरसी परिसरातील लॉजमधील बेकायदेशीर धंदे अधिकच बोकाळल्याचा आरोप होत आहे. तसेच नरसीचे बिट जमादार यांच्यावरही या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे आरोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच ते सहा लॉज असून, त्याठिकाणी अनेक वर्षांपासून अनैतिक प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी वेळोवेळी झाल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी आंदोलन करून हा प्रकार बंद करण्याची मागणी केली होती. काही काळ हा व्यवसाय बंद राहिला; मात्र पुन्हा तो सुरू झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. यापूर्वीही बिलोलीचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांनी नरसी येथील एका बारवर धाड टाकून सहा परराज्यातील महिलांची सुटका केली होती. आता पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेलाच कारवाईसाठी मैदानात उतरावे लागल्याने स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, विक्रम हराळे यांच्या कार्यकाळातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रामतीर्थ पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याची घटनाही घडली होती. त्या प्रकरणानंतर काही काळ मुख्यालयात राहिल्यानंतर हराळे पुन्हा रामतीर्थ पोलीस ठाण्यात रुजू झाले होते. नरसी बसस्थानकासमोरील गल्लीत असलेल्या दोन लॉजवर सुरू असलेल्या कारवाईदरम्यान पुरावे, नोंदी आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू होती. या कारवाईतून नेमके काय निष्पन्न होते, कोणावर गुन्हे दाखल होतात आणि स्थानिक पोलिसांच्या भूमिकेची चौकशी होते का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



