आभाळ फाटले : नायगाव तालुक्यातील हजारो हेक्टरवरील पिके पाण्यात
घरादारात पाणीच पाणी शेकडो कुटूंबे उघड्यावर, पुराच्या पाण्याने नरसी व नायगाव शहरातील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : बुधवारी रात्रभर ढगफुटी सद्रश्य पावसाने गुरुवारी सकाळी नायगाव शहरातून वाहणाऱ्या नदीला मोठा पुर आला. पाहता पाहता पुराने रौद्र रुप धारण केल्याने हजारो हेक्टरवरील पिके मातीमोल झाली. दुसरीकडे अर्धे नायगाव शहर पाण्यात होते त्यामुळे घरादारात व व्यापाऱ्यांच्या दुकानात पुराचे पाणी गेले. विशेष म्हणजे या पावसाने ग्रामीण भागात मोठा धुमाकूळ घातल्याने गोरगरीब नागरिकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. नरसी चौकातील पाणी आजूबाजूच्या दुकानात घुसल्याने व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पावसाने नायगाव तालुक्यात हाहाकार माजवला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले असल्याने आस्मानी संकटामुळे किती नुकसान झाले याचा अंदाज पुर ओसरल्यावरच येणार आहे.

एकीकडे गणरायाचे आगमण झाल्याने आनंदाचे वातावरण होते तर याच रात्री पावसाने धुमाकूळ घातला त्यामुळे नायगाव तालुक्यातील नदी नाल्यांना प्रचंड पुर आला. पावसाने नायगाव तालुक्यात अक्षरशः हैदोस घातल्याने तालुक्यातील जनजीवन तर मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले असून तालुक्यातील हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. कुंटूर, कोकलेगाव, सुजलेगाव, देगाव, मांजरम, कोलंबी परिसराचा संपर्क तुटला होता. इकळीमोर भागात कालवा फुटल्याने शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले.

पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे नरसी बिलोली मार्ग बंद झाला होता तर नरसी चौकातील दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने दुकानदारांचे मोठे नुकसान झाले. त्याच बरोबर ग्रामीण भागात नागरिकांच्या घरा दारात पाणीच पाणी झाल्यामुळे संसारपयोगी साहित्यांचे नुकसान झाले.

नायगाव येथील नदीला दहा वाजल्यानंतर मोठा पुर आला त्यामुळे अर्धे नायगाव शहर पाण्याखाली गेले, जुन्या व नवीन नायगाव शहराचा संपर्कच तुटला होता. नदीला आलेल्या पुरामुळे नागरिकात प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले. कारण मागच्या पंचवीस वर्षात एवढा मोठा पुर आला नव्हता. या पुरामुळे नायगाव शहरातील दत्त नगर व शंकर नगर भागातील घरात नागरिक अडकून पडले होते. पुरात अडकलेल्या नागरिकांना एस डी आर एफ च्या पथकाने बाहेर काढले त्याचबरोबर तालुक्यातील कार्ला येथेही पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना या पथकाने सुरक्षित स्थळी हलवले.

रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे लालवंडी, टाकळगाव पळसगाव, देगाव, गोदमगाव, कोलंबी, मांजरम, इकळीमोर, ताकबिड, मांजरम वाडी येथील घरात पुराचे पाणी गेले असल्याची माहिती मिळाली आहे मात्र पावसाचा तडाखा पाहता तालुक्यात प्रचंड नुकसान झाले आहे. जनावरे किंवा कुठलीही जिवीत हाणी झाल्याची माहिती मिळाली नाही. सकाळच्या वेळी नरसी चौकात पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली होती यावेळी रामतीर्थ पोलीस यंत्रणा मैदानात उतरून वाहतूक सुरळीत केली. दुसरीकडे महसूलची यंत्रणाही सकाळपासूनच सक्रिय दिसून आली.

तहसीलदार धम्मप्रीया गायकवाड यांनी तालुक्यातील पुरग्रस्त भागाला भेट दिली तर नायब तहसीलदार विजय येरवडा यांनी नायगाव शहरातील पुर परिस्थिती हाताळण्यासाठी हजर होते.
भर पावसात खा.रवींद्र चव्हाण ‘आँन फिल्ड’
सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या भीषण परिस्थितीची दखल घेत खा. रवींद्र चव्हाण यांनी तात्काळ अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला.बेटमोगरा, कारला, मांजरम, कोलंबी, कृष्णूर, रातोळी, गडगा, पळसगावसह अनेक गावांचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली.
नायगाव, बिलोली, देगलूर, कंधार, लोहा यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटी व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन खा. रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. नदी नाल्यांनी उग्र रूप धारण केल्यामुळे तात्काळ मदतकार्य सुरू करून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना दिल्या.महापुराने वेढलेल्या गावातील सर्व शेतकरी व गावकऱ्यांना धीर देत, सुरक्षितस्थळी राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
किती मी मी पाऊस पडला बरबडा -91, कुंटुर -103.8, नरसी -115, नायगाव -110.8, मांजरम 110.8 असापाऊस झाला आहे. त्यामुळे नायगाव तालुक्यातील पाचही मंडळात अतिवृष्टी झाली असल्याचे तहसीलदार धम्मप्रीया गायकवाड यांनी सांगितले.
आस्मानी संकटामुळे नायगाव तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला असून. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन अर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

मांजरम येथील पाझर तलावाची पाळू खचल्यामुळे तळे एका बाजूने फुटले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. रात्रभर अशीच परिस्थिती राहील्यास मांजरम भागातील पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. विशेष म्हणजे या पाझर तलावाची दोन वर्षापूर्वी दुरुस्ती करण्यात आली आहे.
पुराच्या पावसाने वेढा घातल्याने नायगाव शहरातील शंकर नगरमध्ये एका घरात अडकून पडलेल्या महिलेला व नागपूर येथील एका व्यक्तीला, त्याचबरोबर कार्ला त मा येथेही पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना नांदेड महानगर पालिकेच्या ‘रेस्क्यू’ पथकाने सुरक्षित स्थळी हलवले.



